राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत आदिती चांदगुडे हिला सांघिक कांस्यपदक

करमाळा, दि. ५ (करमाळा-LIVE)-
ठाणे येथे दि. ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत करमाळा येथील त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबची खेळाडू आदिती चांदगुडे हिने उल्लेखनीय कामगिरी करत सांघिक कांस्यपदक पटकावले आहे.
या स्पर्धेत आदितीने आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे, जिद्दीचे आणि मेहनतीचे प्रदर्शन करत संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले. तिच्या या यशामुळे त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आदितीला त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक सागर शिरसकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अदितीने सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. ती सध्या त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब, करमाळा येथे मल्लखांबचे प्रशिक्षण घेत आहे.
आदितीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी आणि हितचिंतकांनी तिचे अभिनंदन केले. तसेच तिला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक सागर शिरसकर यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.
आदितीने भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करत मल्लखांब क्रीडा प्रकारात यशाची नवनवी शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.



