November 7, 2026

जेऊर येथे रंगणार जेऊर प्रीमियर लीगचा थरार ; ‘कर्मयोगी चषक’साठी १२ संघ, २५० खेळाडू

0
IMG-20261107-WA0057.jpg

जेऊर, दि. ७ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील जेऊर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या जेऊर प्रीमियर लीग (JPL) पर्व सहावे अर्थात ‘कर्मयोगी चषक’साठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होणार असून, लिलाव प्रक्रियेत तब्बल २५० खेळाडूंवर बोली लावण्यात आली. त्यामुळे जेऊर परिसरात क्रिकेटप्रेमींमध्ये स्पर्धेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

भारत महाविद्यालयाच्या सभागृहात खेळाडूंचा लिलाव सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जेऊर गावचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळ, जेऊरचे सचिव अर्जुन सरक, आमदार नारायण पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, विशाल तकीक, योद्धा करिअर अकॅडमीचे संचालक नवनाथ नाईकनवरे तसेच माजी सैनिक शिवाजी खबाले उपस्थित होते.

या लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेल्या १२ संघांच्या मालकांनी आपल्या संघासाठी खेळाडूंची लिलाव पद्धतीने निवड केली. यामध्ये कुर्डू (ता. माढा) येथील बिलाल सय्यद भोसरे याच्यासाठी सर्वाधिक ४२ हजार रुपयांची बोली लागली. त्यामुळे तो या लिलाव प्रक्रियेतील सर्वाधिक बोली मिळवणारा खेळाडू ठरला.

जेऊर प्रीमियर लीगचे सहावे पर्व दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जेऊर येथील मार्केट यार्ड मैदानावर सुरू होणार आहे. आयपीएलच्या धर्तीवर आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत स्थानिक खेळाडूंना आपले क्रिकेट कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. खेळाडूंच्या लिलावाचे थेट प्रक्षेपण यूट्यूबवर करण्यात आले होते.

स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील क्रीडागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि जेऊर परिसरात क्रिकेटची आवड वाढविणे हा या लीगच्या आयोजनामागील उद्देश आहे. १२ संघांमध्ये रंगणाऱ्या या क्रिकेट सामन्यांमुळे क्रिकेटप्रेमींना चुरशीचे सामने पाहण्याची पर्वणी मिळणार आहे.

या स्पर्धेचे आयोजन विष्णू शिंदे, सचिन साळुंखे, राज रोकडे आणि पृथ्वीराज भैय्या पाटील ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page