November 5, 2026

खेलो इंडिया स्पर्धेसाठी करमाळ्यातील त्रिमुर्ती स्पोर्ट्स क्लबचा गोरक्ष लोंढेची निवड

0
IMG-20261105-WA0003.jpg

करमाळा, दि, ५ (करमाळा-LIVE)-
करमाळ्यातील त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचा २१ वर्षीय मल्लखांबपटू गोरक्ष नाथा लोंढे याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या या यशामुळे करमाळ्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिनांक २८ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राजस्थान राज्यातील कोटा येथील युनिव्हर्सिटी ऑफ कोटा येथे ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी मल्लखांब (मुले) २०२६-२७ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधील ७० पेक्षा अधिक विद्यापीठांच्या संघांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत गोरक्ष नाथा लोंढे याने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा या संघाचे प्रतिनिधित्व केले. स्पर्धेत संघातील खेळाडूंनी मल्लखांबचे उत्कृष्ट कौशल्य सादर करत देशभरातून चौथे स्थान पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर विद्यापीठाचा संघ खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र ठरला. चौथे स्थान मिळवल्याबद्दल युनिव्हर्सिटी ऑफ कोटा यांच्या वतीने संघाला पदक व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

गोरक्ष लोंढे हा त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब, करमाळा येथे दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत नियमित सराव करत होता. त्याला या स्पर्धेसाठी पुणे येथील अभिजित भोसले, ठाणे येथील किशोर म्हात्रे तसेच सागर शिरस्कर सर यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले.

गोरक्षच्या या यशाबद्दल त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबचे आधारस्तंभ अॕड. विशाल घोलप, मराठा सेवा संघाचे सचिन काळे तसेच करमाळा पोलीस स्टेशनचे ललित शिंदे यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

करमाळ्याच्या मातीतून राष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या गोरक्ष लोंढे याच्या या यशामुळे त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्याच्या खेलो इंडिया स्पर्धेतील पुढील कामगिरीकडे संपूर्ण करमाळा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page