करमाळा मतदारसंघातील शेती पंपासाठी आठ तास वीजपुरवठा मिळावा ; आमदार नारायण आबा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)-
करमाळा मतदारसंघातील शेतकऱ्यांची सध्या वीजेच्या प्रश्नाबाबत तीव्र नाराजी असल्याचे लक्षात आणून देऊन शेती पंपासाठी आठ तास वीजपुरवठा दिला जावा अशी मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.
राज्याचे पावसाळी अधिवेशन चालू असुन आज आमदार नारायण आबा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवन पॅसेज मध्ये भेट घेतली व एक लेखी निवेदन सुध्दा सादर केले. तसेच करमाळा मतदार संघातील वीजेच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी सांगितल्या.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तशा सुचना संबंधित विभागास देण्यात येत असल्याचे सांगितले. या निवेदनात आमदार नारायण आबा पाटील यांनी नमुद केले आहे की, करमाळा तालुक्यातील उजनी, भीमा सीना जोडकालवा, सीना कोळगाव, मांगी तलाव तसेच विहिर व कुपनलिका आदि पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी वीजेची कपात झाल्याने केळी, ऊस, डाळींब आदि नगदी पिके जळुन चालली आहेत.
यामुळे शेतकऱ्यांना करोडो रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. उजनीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढला असला तरी वीजे अभावी पिकांना पाणी देता येत नाही.
राज्यात इतरत्र पाऊस चांगला झाला असला तरी करमाळा मतदार संघातील अनेक भागात पावसाने दडी मारल्याने शेतातील उभी पिके एगवण्यासाठी शेतकऱ्यांना मेहनत करावी लागते. तसेच शेती पंपास वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेच परंतु शेतीपूरक व्यवसाय सुध्दा धोक्यात आले आहेत.
खास करुन दुध संकलनावर याचा गंभीर परिणाम झाला आहे. शेती पंपाशिवाय घरगुती वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासापासुन वंचित रहावे लागत आहे. उजनील पाणी साठा मायनस झाल्याने पिण्याचे पाणी राखुन ठेवण्यासाठी वीज कपात केली गेली होती. परंतु आता उजनी पातळी प्लस मध्ये आल्याने तात्काळ शेतकऱ्यांना आठ तास वीज द्यावी अशी मागणी या निवेदनातून आमदार नारायण आबा पाटील यांनी केली आहे.



