५ आॕगस्टला लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन ; यशकल्याणी सेवाभवन येथे अंतिम फेरी व पारितोषिक वितरण

करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)-
यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे , शिक्षण विभाग म.न.पा.व जिल्हा परिषद सोलापूरतसेच डिस्ट्रिक्ट इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन सोलापूर ( DELTAS ) यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आल्या आहेत.
या स्पर्धा २७ ते ३१ जुलै या कालावधीत सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पार पडणार असून, त्यामधून निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम जिल्हास्तरीय स्पर्धा व भव्य पारितोषिक वितरण सोहळा ५ ऑगस्ट रोजी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवनात आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी विविध क्षेत्रांतील दिग्गज मान्यवर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, मुख्याध्यापक, इंग्रजी विषय शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश करे-पाटील व SDELTAचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण लावंड यांनी दिली.
इंग्रजी भाषेचे ज्ञान, प्रभावी संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि सार्वजनिक वक्तृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आपली भाषिक क्षमता सादर करण्यासाठी हे एक दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अंतिम फेरीतील विजेत्यांचा यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने पदक (मेडल), सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र तसेच रोख रकमेची आकर्षक बक्षिसे देऊन गौरव करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातीलमराठी ,उर्दू, कन्नड माध्यमांच्या सर्व शाळांनी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहनही प्रा.डॉ. करे-पाटील यांनी केले आहे.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबद्दल आत्मविश्वास निर्माण होण्यास, वक्तृत्व कौशल्याला चालना मिळण्यास तसेच व्यक्तिमत्त्व विकासाला नवी दिशा मिळण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.



